Home Breaking News Chandrapur ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग;

Chandrapur ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग;

130

ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग; दिनेश चोखारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या होऊ घातलेल्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून इच्छुक नेत्यांकडून जोरदार दावेदारी केली जात आहे.

 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक  संतोष कोलकोंडा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अभय छाजेड यांच्या उपस्थितीत इच्छुक पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. जिल्हाध्यक्ष पदासाठी काँग्रेसमधील अनेक नेते इच्छुक असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिनेश चोखारे यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज निरीक्षकांकडे दाखल केला.

 

पक्ष संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असलेले चोखारे यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळताना कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. ते माजी सभापती असून कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूरचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सहकार व कृषी क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे जिल्हा पातळीवर प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजकीय रंगत वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

दरम्यान, निरीक्षकांकडून इच्छुक उमेदवारांशी संवाद साधून संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जात असून पक्ष बळकटीसाठी स्थानिक पातळीवरील मतमतांतरे जाणून घेतली जात आहेत. आगामी काळात जिल्हाध्यक्ष पदाबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून जाहीर होणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here