Home Breaking News लोकमाता अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा – औदुंबर शिंदे पाटील प्रश्नमंजुषा...

लोकमाता अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा – औदुंबर शिंदे पाटील प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या

9

लोकमाता अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा – औदुंबर शिंदे पाटील

 

प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्याचा सन्मान 

 

चंद्रपूर दिनाक ०१/०६/२६

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि लोककल्याणकारी धोरणांच्या बळावर भारतीय इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले. सामाजिक समरसता, महिला सक्षमीकरण, शेतकरी हित, जलसंवर्धन आणि सांस्कृतिक वारसा जतनासाठी त्यांनी केलेले कार्य आजच्या समाजासाठी दिशादर्शक असून त्यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक औदुंबर शिंदे पाटील यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे नुकताच आयोजित लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक उराडे होते. प्रमुख वक्ता म्हणून इतिहास अभ्यासक चौंडी अरणगांव येथील औदुंबर शिंदे पाटील होते.प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, अधिसभा सदस्य तथा श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी वरकड, अध्यासन केंद्राचे प्रस्तावक गुरुदास कामडी, उपप्राचार्य डॉ. आर. खैरानी, समन्वयक सुषमा बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण तसेच विद्यापीठ गीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

आपल्या व्याख्यानात औदुंबर शिंदे पाटील यांनी अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेताना सांगितले की, सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अहिल्यादेवींनी असामान्य नेतृत्वगुण, प्रजाहितदक्षता आणि न्यायनिष्ठेच्या बळावर लोकमाता म्हणून लौकिक प्राप्त केला. त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महेश्वरी वस्त्रोद्योगाला चालना दिली. देशभरातील तीर्थक्षेत्रे, घाट, धर्मशाळा, विहिरी आणि मंदिरांच्या उभारणीद्वारे त्यांनी भारतीय संस्कृतीचे संवर्धन केले. काशी विश्वनाथ मंदिरासह अनेक ऐतिहासिक मंदिरांच्या जीर्णोद्धारातून त्यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे महान कार्य केले. त्यांच्या तीस वर्षाच्या राज्यकारभाराला इतिहासात सुवर्णकाळ म्हणून गौरविण्यात येते .

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न ५५ महाविद्यालये, शाळा व कनिष्ठ महाविद्यालये ३ , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व अन्य बार स्पर्धक , अन्य १२ स्पर्धेमध्ये असे एकूण ६०८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुदास कामडी यांनी केले. त्यांनी अध्यासन केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य डॉ. संभाजी वरकड यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गुरुदास बल्की यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. आर. खैरानी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर समाजात रुजविणारा हा जयंती सोहळा विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.

बॉक्स —-

प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेते

प्रथम क्रमांक : मानसी श्रीनिवास गाडगे (शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर), नागकृष्ण मुरली जक्करवार (शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा) आणि रवींद्र विनोद पाटील (लोकमान्य महाविद्यालय, वरोरा).

द्वितीय क्रमांक : अविनाश भास्कर राऊत (सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय, चंद्रपूर), माधुरी रामदास शेडमाके (श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा), तुषार अनिल हजारे (एमबीए व पीजीडीटी विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), स्वरूपा बलिराम धांडे (आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वडसा) आणि मनीष सुरेश गुरनुले (सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर).

तृतीय क्रमांक : सचिन पंढरी खेडेकर (महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी), आकाश पुंडलिक निकुरे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रह्मपुरी) आणि नागेश भगवान खांडेकर (शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here