चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहराजवळील नागपूर राष्ट्रीय महामार्गावर घडला अपघात, पळसगाव जाट येथील बोकडी नदीपात्रात रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक कोसळला.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरालगतच्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पळसगाव जाट येथे बोकडी नदीपात्रात रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक कोसळला. एमएच ४० सीटी ९२४१ या क्रमांकाचा ट्रकने पुलाचे सुमारे १०० फूट सिमेंट कठडे तोडून नदीपात्रात झेप घेतली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रेती आणि गिट्टीची वाहतूक वेगाने केली जाते. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. महामार्गावरील वाढत्या अपघातांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. अवैध आणि बेधडक वाहतुकीवर नियंत्रण आणून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.





