ग्रामीण मातीतून उंच भरारी : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पब्लिक स्कूलचा CBSE दहावीचा अभिमानास्पद निकाल
येनबोडी परिसरातील बल्लारपूर पब्लिक स्कूलने CBSE दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. ग्रामीण आणि वंचित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळाल्यास ते मोठी झेपी घेऊ शकतात, हे या निकालाने सिद्ध केले आहे.
शाळेच्या विद्यार्थिनी स्वीकृती सुभाष पुनेकरने ९३.६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तिने इंग्रजी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. द्वितीय क्रमांक तमन्ना प्रशांत वासाडे यांनी (९३%) आणि तृतीय क्रमांक तन्वी नितीश क्षीरसागरने (९२.६%) पटकावला.
सुमारे ३६ गावांतील विद्यार्थ्यांना वाजवी शुल्कात CBSE पद्धतीचे दर्जेदार शिक्षण आणि शिस्तबद्ध वातावरण देणारी ही शाळा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यामुळेच हे यश मिळाल्याचे मानले जाते.
संस्थेचे अध्यक्ष संजय वासाडे, व्यवस्थापक प्रो. मेघा शुक्ला आणि प्राचार्या ज्योत्सना बाबुलकर यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.





